पुणे( प्रतिनिधी):- पुणे येथे १९ मार्च रोजी झालेल्या आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्रातील ३२ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. अत्यंत रोमांचक आणि चुरशीच्या लढतीत आपल्या बुद्धिमत्तेचा आणि कौशल्याचा प्रभाव दाखवत, विलासराव देशमुख लॉ कॉलेजचा आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील चेतन चव्हाण यांनी ५ पैकी सर्व ५ फेऱ्या जिंकत विजय मिळवला. त्यांच्या या विक्रमी कामगिरीबद्दल त्यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. चेतन चव्हाण यांच्या विजयामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील बक्षीस समारंभात मॉडर्न लॉ कॉलेज, पुणेच्या प्राचार्या डॉ. अनन्य बिबवे यांच्या हस्ते चेतन चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या भव्य यशामुळे महाराष्ट्रातील बुद्धिबळ क्षेत्रात त्यांचे नाव आणखी उजळले आहे.
चेतन चव्हाण बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवाशी असून त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय – आपल्या महाविद्यालयाला, बुद्धिबळ मार्गदर्शक सुरेश चव्हाण, तसेच आपल्या आई-वडिलांना दिले. “त्यांच्या सततच्या पाठिंब्यामुळे आणि मार्गदर्शनामुळेच मी हे यश मिळवू शकलो,” असे यावेळी चेतन चव्हाण यांनी सांगितले.
विशेष म्हणजे चेतन चव्हाण आंतरराष्ट्रीय स्तरावर रेटिंग प्राप्त बुद्धिबळपटू असून, गेल्या दहा वर्षांपासून पुण्यात नवोदित बुद्धिबळ खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी बुद्धिबळात उत्तुंग यश मिळवत आहेत.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या बुद्धिमत्तेचे, मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले. बुद्धिबळ क्षेत्रात नवे खेळाडू घडवणारे ते एक आदर्श प्रेरणास्रोत ठरत आहेत.








