MAHARASHTRANITI/महाराष्ट्रनिती

इंडियन रेडक्रॉस सोसायटी होणार सामाजिक सेवेचा वटवृक्ष – डॉ. किरण पाटील

सोसायटी कार्यालयाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन : मान्यवरांची उपस्थिती

बुलढाणा (जिमाका) :  रेडक्रॉस सोसायटी ही आपल्या जिल्ह्यासाठी नवी असली तरी तिचं कार्य मोठे आहे. या कार्यात प्रत्येकाने थोडा वेळ समाजासाठी दिला, तर ही संस्था लवकरच एक मोठा वटवृक्ष बनेल आणि समाजाला त्याची सावली लाभेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी रेडक्रॉस सोसायटीच्या उद्घाटन प्रसंगी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात इंडियन रेड क्रॉस सोसायटी या सेवाभावी संस्थेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन व सेवाकार्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा शल्य चिकित्सक तथा पदसिद्ध उपाध्यक्ष (इंडियन रेड क्रॉस सोसायटी) डॉ. भागवत भुसारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील, दिव्यांग व पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश छाजेड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे, इंडियन रेड क्रॉस सोसायटी बुलढाणाचे कार्याध्यक्ष विनोद जवरे, उपकार्याध्यक्ष ॲड.जयसिंग देशमुख, सचिव रवींद्र लहाने, कोषाध्यक्ष विकास दळवी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, रेडक्रॉस सोसायटी या संस्थेचे आज प्रतीकात्मक वृक्षारोपण केले आहे. आता त्याचे संगोपन आणि विकास ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. संस्था लहान असताना तिचे रक्षण आणि पोषण केल्यास भविष्यात सर्वांना त्याचा लाभ होतो. रेडक्रॉसने स्वतंत्र उपक्रम राबवण्यापेक्षा विद्यमान सामाजिक संस्था व संघटनांशी समन्वय साधावा. दंत चिकित्सक संघटना, आयुर्वेदिक संस्था, आपत्ती मित्र संघटना, दिव्यांग पुनर्वसन केंद्र, तसेच विविध शैक्षणिक संस्था यांच्याशी समन्वय साधून एकत्रित सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, संस्थेचे कार्यालय सुरळीत चालवण्यासाठी कार्यालयाचे देखभाल, वीज बिल, कर्मचारी मानधन, तसेच नोंदी व रजिस्टर यांसारख्या खर्चासाठी सर्वांनी आर्थिक सहकार्य करावे. रेडक्रॉसचे कार्य वाढवणे ही मोठी जबाबदारी असून, हे कार्य सर्वांच्या सहभागानेच यशस्वी होईल, असे त्यांनी नमूद केले. विशेषतः दिव्यांगांसाठी मोफत सहाय्यक उपकरणे पुरविण्याचे कार्य, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रम राबवण्यावर त्यांनी भर दिला.

आपल्या व्यवसायाबरोबर समाजासाठी वेळ देणे ही खरी सेवा आहे. जिल्ह्यातील औद्योगिक संस्था, पतसंस्था आणि प्रभावशाली व्यक्तींनी या सेवाभावी कार्यात पुढाकार घेतला, तर रेडक्रॉस सोसायटी ही एक प्रभावी सामाजिक शक्ती म्हणून उभी राहील आणि गोरगरिबांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळेल,” असे प्रतिपादन डॉ. पाटील यांनी केले.

इंडियन रेड क्रॉस सोसायटी या सेवाभावी संस्थेच्या कार्याची माहिती प्रास्ताविकातून इंडियन रेड क्रॉस सोसायटी कार्याध्यक्ष विनोद जवरे यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उज्वला वर्मा यांनी तर आभार महेंद्र सौभाग्य यांनी केले.

Maharashtraniti
Author: Maharashtraniti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts