मंचर (प्रतिनिधी ) पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर ता. येथील बाजारतळाच्या शेजारी असणाऱ्या ओढ्यावर वेगवेगळ्या अतिक्रमण झाल्याने पुराचे पाणी पुलावर आणि बाजारात घुसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात ४ जुलै २०२५ बातमी करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर वृत्तांकन सुरू असतानाच पांडुरंग मोरडे या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या इसमाने खुनी हल्ला केला आहे. यापूर्वी पांडुरंग मोरडे खुनाच्या प्रकरणात शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आला आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, जबर मारहाण अशा स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मंचर येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या पांडुरंग मोरडे नावाच्या इसमाने या ओढ्यावर मोठी भिंत बांधून जवळपास ५०० ब्रास दगड, मुरूम टाकून भराव करून गाळे बांधण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे ओढ्याचा प्रवाह असून मंचर भाजी मंडई, ओढ्यावरील पूल आणि शहरात पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अतिक्रमणाच्या संदर्भात मंचर नगरपंचायत आणि निघोटवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने मोरडे यांना काम बंद करण्याचे आदेश देऊनही त्यांनी काम सुरूच ठेवले होते. या बाबत बातमी करत असतानाच पांडुरंग मोरडेने स्नेहा बारवे यांच्यावर लाकडी दांडक्याने डोक्यावर, पाठीवर आणि कमरेवर प्रहार केले. प्रहार एवढे जोरदार होते की; पत्रकार स्नेहा बारवे पहिल्याच फटक्यात जमिनीवर कोसळल्या. यानंतर पांडुरंग मोरडेने त्यांच्यावर अनेक प्रहार केले. या मारहाणीत स्नेहा बारवे बेशुद्ध पडल्या. यानंतर त्यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पिंपरी येथील डी वाय पाटील रुग्णालयात पाठविले. पत्रकार स्नेहा बारवे यांना मारहाण सुरू असताना तेथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी ही मारहाण थांबविण्याच्या प्रयत्न केला. मात्र पांडुरंग मोरडे यांनी बोलाविलेल्या इतर गुंडांनी मारहाण प्रकरणात हस्तक्षेप करणाऱ्यांनाही जबर मारहाण केली. या मारहाणीत मध्यस्थांनाही दुखापत झाली असून वासुदेव काळे यांनी याबाबत मंचर पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणात पांडुरंग मोरडेने पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर खुनी हल्ला केल्याने मोरडेवर खुनाचा प्रयत्न आणि पत्रकार संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक पत्रकार करत आहेत. तर या घटनेचा सर्व पत्रकार संघटनाकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. तर “महाराष्ट्रनिती” मीडिया ग्रुपच्या वतीने या भ्याड व खुनी हल्याच्या जाहीर निषेध करीत आहे.








