नाशिक (जिल्हा प्रतिनिधी – जय जोशी) :- नाशिक पोलिसांकडून सरकारच्या हेल्मेट सक्तीची लक्तरे तोडल्या जात असून सर्व सामान्यांना कायदा शिकविणारेच कायदा मोडत असतील तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस व वरिष्ठ अधिकारी कारवाई करतील का? कि विभागाची पाठराखण करणार हे पाहणे महत्वाचे ठरेलं!

नाशिक शहरात पोलीस दलावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर एक छायाचित्र सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन पोलीस अधिकारी MH 15 FK 4061 या क्रमांकाच्या TVS Jupiter स्कुटीवर बिनधास्तपणे, विनाहेल्मेट फिरताना दिसतात. शिस्त, कायदा, आणि सुरक्षेच्या नावाखाली सामान्य जनतेवर दंड ठोठावणारे हेच पोलीस अधिकारी स्वतः नियम मोडताना दिसत आहेत. मग हा कायदा केवळ जनतेसाठीच आहे का? गणवेश घालितल्याने कायदा मोडण्याची मुभा मिळते का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
🛑 “पोलीस असल्याचा अर्थ कायद्याच्या वर नाही!”
वाहन चालवताना हेल्मेट न घालणं ही सरळ सरळ वाहतुकीच्या कायद्याचं उल्लंघन आहे. शहरातील सर्व रस्त्यांवर सीसीटीव्ही, पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रणासाठी गस्त सुरू असताना हेच अधिकारी कायद्याची थट्टा करताना दिसल्याने संताप अधिक वाढला आहे.”जे रक्षण करतात, तेच भक्षक झाले तर न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल सोशल मीडियावर व्यक्त होतोय.
📣 नागरिकांचा थेट इशारा – “कायदा मोडायचा असेल, तर गणवेश उतरवा!”
“जे पोलीस हेल्मेटशिवाय फिरतात, त्यांच्यावरही दंड व्हायला हवा, मग ते अधिकारी असोत की शिपाई. कायदा हा सर्वांसाठी सारखाच हवा!” असं एका स्थानिक नागरिकाने बोलताना स्पष्ट सांगितलं.काही नागरिकांनी या घटनेबाबत नाशिक ट्राफिक पोलीस विभागाकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली असून, संबंधित वाहन व अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी होत आहे.
❗ दुहेरी चेहर्याची यंत्रणा?
सामान्य नागरिक नियम मोडले तर दंड, आणि पोलीस अधिकारी मोडले तर दुर्लक्ष? हा दुहेरी चेहरा आता थांबायला हवा. अन्यथा लोकांचा पोलिसांवरील विश्वास उडायला वेळ लागणार नाही. “गणवेशाचा आदर हवा असेल, तर आधी कायद्याचं पालन करा!” अशी नागरिकांकडून बोलल्या जात आहे.








