MAHARASHTRANITI/महाराष्ट्रनिती

भूक खरी, पण अन्न खोटं! भेसळीत बुडालेलं ताट

भेसळयुक्त करणाऱ्यांचा समाजाने बहिष्कार घातला पाहिजे

नाशिक ( जय जोशी ):- दूधात डिटर्जंट, मसाल्यात विटांचा पूड, मिठाईत घातक रंग, फळांवर रसायनं… असं काही आहे का जे आज शुद्ध मिळतं? पोट भरलं तरी शरीर आजारी, चव मिळाली तरी आयुष्य कमी. अन्नाऐवजी आपण रोज थोडं-थोडं विष गिळतोय.

शेतकरी रडतो, दलाल हसतो 

शेतकरी प्रामाणिकपणे शुद्ध धान्य पिकवतो. पण ते ग्राहकापर्यंत पोहोचण्याआधीच दलाल-व्यापाऱ्यांच्या भेसळीच्या जाळ्यात अडकतं. शेतकरी रडतो, दलाल हसतो आणि ग्राहकाच्या ताटात विषारी अन्न पोहोचतं.

चांगल्यावर कारवाई, भेसळखोरांना मोकळीक

विडंबन बघा –दर्जेदार अन्नपदार्थ तयार करणाऱ्यांवर खोटी कारवाया केल्या जातात, पण भेसळ करणाऱ्यांना मात्र पैशांच्या जोरावर मोकळं रान दिलं जातं. सरकारच्या आश्वासनांच्या गप्पा सुरू आहेत, पण भेसळखोरांचा धंदा मात्र वाढतोय.

सत्ताधाऱ्यांची ढोंगी भक्ती

निवडणुकीच्या भाषणात “जनतेच्या आरोग्याची काळजी” घेण्याचं गोड बोलणारे नेते स्वतः शुद्ध अन्न खातात. पण जनतेला मात्र विषारी घास गिळायला लावतात. हाच का जनतेच्या सेवेसाठी घेतलेला शपथविधी?

प्रसादात भक्ती की विष?

आज मुलांच्या हातात दुधाचा ग्लास देतानाही आईला शंका येते की हे खरं दूध आहे की पांढरं केमिकल? देवाला प्रसाद दाखवतानाही भक्ताला प्रश्न पडतो? प्रसादात भक्ती आहे की विषारी रंग? मग हे कसले देव, कसली भक्ती, कसला धर्म?

लोकांनी उठाव करायलाच हवा

अन्न हे ‘जीवन’ आहे. पण आपण तेच अन्न हळूहळू ‘मृत्यू’मध्ये बदलत चाललो आहोत. आता फक्त सरकारवर बोट दाखवून भागणार नाही. शुद्ध अन्न घेण्यावर आपण आग्रह धरला पाहिजे. भेसळखोरांना समाजाने बहिष्कार घालला पाहिजे एवढे मात्र खरे! नाहीतर उद्या भूक भागवण्यासाठी पोटभर अन्न नको, पोटभर औषधं लागतील!

अंतिम आवाहन

आज भूक खरी आहे, पण अन्न खोटं आहे. जर देशाने आवाज उठवला नाही, तर उद्या विषारी ताटातून फक्त जनता नाही, तर लोकशाहीचाही नाश होईल. आता वेळ आली आहे – भेसळखोरांच्या ताटांसोबतच ढोंगी राजकारण्यांची ताटंही उलथून टाकण्याची!

Maharashtraniti
Author: Maharashtraniti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts