गेवराई (प्रतिनिधी): – भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेवराई येथील सर्व मशिदींमधून भारतीय सैन्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या सुरक्षिततेसाठी आणि विजयासाठी स्थानिक मुस्लिम समुदायाने एकजुटीने प्रार्थना केली. हा अनोखा उपक्रम गेवराईच्या सामाजिक ऐक्याचे आणि राष्ट्रीय भावनेचे प्रतीक ठरला आहे.

शुक्रवारच्या नमाजानंतर शहरातील सर्वच मशिदींमध्ये हजारो नागरिकांनी दुआमध्ये सहभाग घेतला. यावेळी मौलवी आणि धर्मगुरूंनी सैनिकांच्या शौर्याला सलाम करत त्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. “आमचे सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण करत आहेत. त्यांच्यासाठी दुआ करणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे दरगाह मस्जिदचे मौलवी जिया अहमद कादरी यांनी सांगितले.स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. “हा क्षण आमच्या एकतेची ताकद दर्शवतो. धर्म आणि समुदायापलीकडे जाऊन आम्ही सर्वजण भारतीय आहोत,” असे मत सामाजिक कार्यक्रते जुनेद बागवान यांनी व्यक्त केले. यावेळी काही मशिदींमध्ये सैनिकांच्या कुटुंबीयांसाठीही विशेष प्रार्थना करण्यात आल्या.भारत-पाकिस्तान युद्धाच्या तणावपूर्ण वातावरणात गेवराईच्या या उपक्रमाने देशभक्ती आणि सामुदायिक बांधिलकीचा संदेश दिला आहे. स्थानिक प्रशासनानेही या शांततापूर्ण आणि सकारात्मक प्रयत्नांचे कौतुक केले. “गेवराईने एक आदर्श निर्माण केला आहे. देशाच्या एकतेसाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत,” असे नायब तहसीलदार संजय सोनवने यांनी म्हटले.या दुआच्या माध्यमातून गेवराईच्या नागरिकांनी सैनिकांच्या धैर्याला आणि त्यांच्या बलिदानाला मानवंदना दिली. हा उपक्रम इतर शहरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.








