MAHARASHTRANITI/महाराष्ट्रनिती

क्षमता असणाऱ्यांना बाहेर ढकलणे व नसणाऱ्यांना आमंत्रित करून लाभापासून वंचित ठेवणे म्हणजे क्रिमीलेअर होय- बी. बी. मेश्राम

छत्रपती संभाजी नगर येथे १२९ वी वैचारिक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा संपन्न

छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलच्या वतीने संस्थेचे जनसंपर्क कार्यालय साकेत नगर, छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र येथे “क्रिमीलेअरचे समाज जीवनावर होणारे दुरगामी परिणाम आणि आपली भूमिका.” या प्रासंगिक विषयावर १२९ वी वैचारीक प्रबोधनात्मक साप्ताहीक कार्यशाळा २४ ऑगस्ट २०२५ ला संपन्न झाली. 

फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलचे संचालक बी. बी. मेश्राम अध्यक्षीय मार्गदर्शन करताना म्हणाले की, क्रिमीलेअरचा इतिहास तपासून पाहत असतांना १९७१ ला सत्तानाथन आयोगाने प्रथमतः शिफारस केल्याचे आढळते. पुढे १९९२ ला मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींसाठी आरक्षणाची अंमलबजावणी करीत असताना इंद्र सहानी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात आरक्षणाची मर्यादा ५० टक्के करणे व ओबीसीला क्रिमिलेअर लावणे गरज नसताना बंधनकारक करण्यात आले. क्रिमीलेअर साठी सुरुवातीला १९९३ मध्ये पालकाच्या उत्पन्नाची मर्यादा एक लाख रुपये होती. तर आता २०१७ पासून ती आठ लाख करण्यात आली आहे. सक्षम नसल्यामुळे लाभापासून वंचित राहणाऱ्यांना लाभार्थी बनविण्यासाठी त्यांच्यात क्षमता विकसित व्हावी यासाठी शासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत. जेणेकरून क्रिमीलेअर लावण्याची वेळ येणार नाही. क्रिमीलेअर लागू करणे म्हणजे क्षमता असणाऱ्यांना प्रवाहा बाहेर ढकलून क्षमता नसणाऱ्यांना प्रवाहात येण्यासाठी आमंत्रण देऊन दोन्हीला लाभापासून वंचित ठेवण्याचे हे राज्यकर्त्यांचे षडयंत्र आहे. करिता कुठल्याही संवैधानिक समूहाला क्रिमिलेअर लावू नये किंवा त्यांचे उपवर्गीकरण करू नये. परिणामी एकजिनसी भारतीय समाज निर्माण होऊ शकेल. त्यासाठी प्रबोधन हा दीर्घकालीन लढा असला तरी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. जेणेकरून अज्ञानी समाजाला उपवर्गीकरण व क्रिमीलेअरचे दुष्परिणामाच्या अनुषंगाने सज्ञानी करण्याची भूमिका आपण पार पाडली पाहिजे.

उद्घाटन पर मार्गदर्शन करताना अ‍ॅड. अविनाश थिटे म्हणाले की, क्रिमिलेअर हा देशव्यापी मुद्दा आहे. १९९२ ला ओबीसींना आरक्षण लागू करत असताना ओबीसीतील उच्चभृणा क्रिमीलेअर ची अट लावण्यात आली. आजचा श्रीमंत हा उद्या श्रीमंत असेलच असे नाही. त्यामुळे आर्थिक आधारावर अशा प्रकारची अट लागू करणे सामाजिक दृष्ट्या योग्य नाही. पुरेशा प्रमाणात सांख्यिकीय माहिती उपलब्ध नसताना अशी अट एससी, एसटी ना सुद्धा लागू करणे योग्य होणार नाही. त्यामुळे समाजात अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे घटनेतील कलम १४, १५, १६ ची पायमल्ली होणार आहे. परिणामी समूहातील परस्परांत तेढ निर्माण होईल. तरी जाती जातीत भांडणे लावून बंधुत्व समाप्त करू नये. अशाप्रकारे एकजिनसी समूहांना विभाजित करून विकलांग करण्याचे षडयंत्र सुरू आहे.

प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते ॲड. राजू बागुल म्हणाले की, आरक्षणाची व्यवस्था जगभरात लागू आहे मात्र त्याचे नामाभिधान वेगवेगळे आहेत. गोविंद वल्लभ पंत यांनी आरक्षणाला विरोध दर्शविला तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कि, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्याकरिता प्रतिनिधित्वाची व्यवस्था करणे म्हणजे आरक्षण होय. समाज जीवनात आम्हाला बदल होत असताना सामाजिक लोकशाहीच्या अस्तित्वासाठी व्यक्तीच्या विद्वत्तेला नैतिकतेची जोड असणे आवश्यक आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणातील मुद्द्यावर न्यायाधीश बेला त्रिवेदी यांनी आपला नकाराधिकार वापरला होता. याची आपण विशेष नोंद घेतली पाहिजे. अशाप्रकारे एससी, एसटी चे उप वर्गीकरण करणे तसेच त्यांना क्रिमिलेअर लावणे संयुक्तिक ठरणार नाही. याप्रसंगी उद्योजक शशिकांत काळे म्हणाले की, आंबेडकराईट आंदोलनाचा कारवा पुढे ओढण्याचे काम सुशिक्षितानी हव्या त्या प्रमाणात केले नाही. अनुसूचित जातीत ५९ जाती असताना केवळ बौद्धच त्यासाठी लढताना दिसतात. दहा दहा वर्षे एकत्र राहणाऱ्या व्यक्तींना आपण एकाच समूहातील असल्याचे जाणीव नसणे हे फारच भयानक आहे. इंजि. प्रकाश उजगरे म्हणाले की, कार्यशाळेतून पुढे आलेली वास्तविकता इतरांपर्यंत पोहोचविले पाहिजे आणि अनिष्ट चालीरीतींना पायबंद घातला पाहिजे. प्रा. शिवम गायकवाड म्हणाले की, असमान समूहाला समान पातळीवर आणण्यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या पाहिजेत. आरक्षणाची तरतूद असताना सुद्धा संबंधित लाभार्थ्यापर्यंत ते पोहोचू दिले जात नाही, याचाच एक भाग म्हणजे क्रिमीलेअर होय. तरी शांतीने क्रांती केली पाहिजे. नामविस्ताराचे उत्सव विद्यापीठ गेटच्या बाहेर होतात, जे विद्यापीठाच्या आत व्हायला पाहिजेत. म्हणून व्यवस्थेत घुसले पाहिजे.

सुरुवातीला आदर्शांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला व पुष्प अर्पण करण्यात आले तर स्टडी सर्कलच्या वतीने मान्यवरांचे व उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन अ‍ॅड. विलास रामटेके, प्रास्ताविक इंजि. किशोर पाटील यांनी तर आभार साधू आनंद यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यशाळेला बी. बी. मेश्राम, अ‍ॅड. विलास रामटेके, इंजिनीयर किशोर पाटील, अ‍ॅड. राजू बागुल, प्रकाश उजगरे, सिद्धार्थ गायकवाड, यशोदीप नवगिरे, विशाल रगडे, उद्योजक शशिकांत काळे, प्रा. शिवम गायकवाड, साधू आनंद इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते.

Maharashtraniti
Author: Maharashtraniti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts