टुनकी ता. संग्रामपूर ( प्रतिनिधी ):- अकोला अमरावती बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बसलेल्या विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या वारी येथील, हनुमानसागर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे दोन दिवस धरणातून सतत पाणी सोडण्यात आले. गुरुवार ४ सप्टेंबर रोजी धरणात ८८.२१ टक्के जलसाठा नोंदवला गेला, दरम्यान पाणलोट क्षेत्रात आजवर ५७७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणाचे दोन दरवाजे उघडे असून, वान नदीपात्रात समान प्रमाणात पाणी सोडले जात आहे. परिणामी वान प्रकल्प पूरनियंत्रण कक्षाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.धरणाचे दोन दरवाजे ५० सें.मी.ने उघडण्यात येऊन गेल्या दोन दिवसांपासून धरणातून वान नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या विसर्गामुळे वान नदीला पूर आला तर, पुरामुळे संग्रामपूर तालुक्यातील मोमीनाबाद गावचा संपर्क तुटला.वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचलन सूचीनुसार सप्टेंबर अखेरीस धरणात ९५ टक्के पाणीसाठा अपेक्षित असतो. या पार्श्वभूमीवर धरण सुरक्षेच्या दृष्टीने दोन दरवाजे उघडून विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली.

मात्र मागील वर्षाच्या तुलनेत जलसाठ्यात घट
वारी येथील हनुमानसागर धरणात ४ सप्टेंबर २०२५ रोजी ८८.२१ टक्के जलसाठा आहे गतवर्षी याच दिवशी (४ सप्टेंबर २०२४) जलसाठा ९५.८४ टक्के जलसाठा होता. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत ७.६३ टक्क्यांची घट झाली असली तरी.सततधार पाऊस व धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने वान नदी भरभरून वाहत असल्याने वाननदी परिसरातील गावांमध्ये व शेतशिवारातील विहिरींच्या पाण्याची पातळी निश्चितच वाढणार असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलल्या जात आहे








