बुलढाणा(प्रतिनिधी)- : “योगाभ्यासाच्या माध्यमातून शिक्षित, सुसंस्कृत व स्वस्थ नागरिक, युवक घडविणे ही आजची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात केले. जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणा येथे 21 जून रोजी शनिवारी सकाळी ७ ते ७.४५ या वेळेत ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या विशेष योग कार्यक्रमात शहरातील सुमारे २५०० योगप्रेमींनी सहभाग नोंदवून निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पौळ, अनिल गोडगे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर, शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, मुख्याधिकारी गणेश पांडे, पत्रकार राजेंद्र काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.किरण पाटील म्हणाले की, योगाभ्यास आजची गरज आहे. देशभरात प्रत्येक ठिकाणी हजारो नागरिक योग दिनाच्या आयोजनात सक्रीय सहभाग घेत आहेत व निरामय आयुष्य जगण्याची जीवनशैली अंगीकारत आहेत. बुलढाणा जिल्हावासियांनीही आपल्या निरोगी आरोग्यासाठी योग जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय, क्रीडा व युवक सेवा संचालनालय य, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, नेहरू युवा केंद्र, जिल्हा योग संघटना, आरोग्य भारती, क्रीडा भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, योग विद्याधाम, आरोग्य विभाग, योगांजली योग वर्ग, पतंजली योग समिती, ए.एस.पी.एम.आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, औद्योगीक प्रशिक्षण संस्था, बुलढाणा जिल्हा एकविध खेळ संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, आरोग्य भारती, क्रीडा भारती, ब्रम्हकुमारीज, योग प्रशिक्षार्थी, जिल्ह्यातील योग संस्था, शाळा-महाविद्यालये व विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमात अंजली परांजपे, प्रशांत लहासे, भूषण मोरे, उर्मिला दीदी, अच्युतराव उबरहंडे, बालयोगी क्षितीज निकम आदींनी योगाचे प्रात्यक्षिक सादर केले. प्राणायाम, कपालभाती, अनुलोम-विलोम व ध्यानसाधना यासारखे योगप्रकार शिस्तबद्धरीत्या घेण्यात आले. सहकार विद्यामंदिर, शारदा ज्ञानपीठ, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नर्सिंग कॉलेज, समाजकार्य महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय आदी संस्थांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आणि शासकीय कार्यालयांचे अधिकारी, शिक्षक, क्रीडाप्रेमी नागरिक, योगप्रेमी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी आयुष मंत्रालय अंतर्गत उपस्थितांना योगा मॅट्स तसेच योगप्रेमींकरिता टि-शर्टचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे शेवटी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रभाकर वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता जिल्हा प्रशासन, नगर परिषद प्रशासन, शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, इत्यादींनी परिश्रम घेतले. अंतिम टप्प्यात सचिन खाकरे व उर्मिला दीदी यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने योग दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
बुलढाणा जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
बुलढाणा : जिल्हा कारागृह व जिल्हा विधीसेवा प्राधिकरण बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने कारागृहात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कारागृह अधीक्षक संदीप भुतेकर, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव नितीन पाटील, ॲड. मारोडकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी मेघा बाहेकर, तसेच कारागृह अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. योग शिक्षक डॉ. वैशाली नाईक यांनी नियमित योग अभ्यास करण्याच्या लाभाबाबत मार्गदर्शन केले. तसेच कारागृहात राहून यशवतंराव चव्हाण मुक्त विद्यापिठामार्फत योग शिक्षकाचे शिक्षण पूर्ण करणारे चार बंदी यांनी यावेळी कारागृहातील इतर बंद्यांकडून योगाभ्यास करुन घेतला. योग अभ्यासानंतर ॲड.विक्रांत मारोडकर यांनी बंद्यांना कायदेविषयक मालसा व नालसाच्या सर्व योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले.








