टुनकी ता. संग्रामपूर( प्रतिनिधी )गत काही दिवसांपासून सातपुडा पर्वतीय क्षेत्रात धोss धोss पाऊस कोसळत आहे त्यामुळे दमदार पावसाअभावी कोरडा पडलेला जटाशंकर येथील धबधबा प्रवाहित झाला आहे.

जटाशंकर हा धबधबा प्रवाहित झाल्याने येथे एरवी पसरलेल्या निरव शांततेत पर्यटकांची चहल पहल पुन्हा वाढणार असल्याचे दिसून येत आहे, निसर्गाच्या सानिध्यात सातपुड्याच्या पर्वतीय क्षेत्रामध्ये निरव शांततेत झुळझुळपणे वाहणारा हा धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी व निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे, दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये पावसाचे सरासरी प्रमाण पाहता हा धबधबा प्रवाहित झालेला असतो, परंतु यावर्षी सातपुडा पर्वतीय क्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस नसल्याने श्रावण महिन्यात हा धबधबा पूर्णता कोरडा पडलेला होता. परिणामी या निसर्ग पर्यटनस्थळी मोठ्या उमेदीने येणाऱ्या पर्यटकांसह शिवभक्तांचा हिरमोड झाला होता व प्रत्येक जण धबधबा प्रवाहित झाला का ? याचीच सातत्याने विचारणा करत होते, सातपुड्याचा पर्वतीय परिसर म्हणजे पर्यटकांसाठी एक नवी पर्वणीच म्हणावी लागेल अशातच सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेल्या वसाली येथे इको सायन्स पार्क यासह आंबाबारवा अभयारण्याची जंगल सफर ही सर्वांनाच भुरळ घालते, त्यामुळे एरवी येणाऱ्या सुट्टीच्या दिवसात हवापालट करण्यासाठी बरेच पर्यटक व निसर्गप्रेमी सातपुडा पर्वतीय क्षेत्राला प्राधान्य देतानाचे चित्र प्रकर्षाने पाहावयास मिळते, दरम्यान यावर्षी स्थानिक वन विभागाच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने जंगल सफारी दोन महिन्यासाठी बंद ठेवण्यात आलेली आहे, पावसाचे प्रमाण संपुष्टात येतात ही जंगल सफारी पुरवत सुरू होऊन निसर्गप्रेमी तसेच पर्यटकांना अंबाबारवा अभयारण्याचे दर्शन घडेल.. तूर्तास जटाशंकरचा धबधबा प्रवाहित झाल्याने हे निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांची पावले या दिशेने वळताना दिसत आहेत एवढे मात्र खरे !








