MAHARASHTRANITI/महाराष्ट्रनिती

वर्ग शिक्षकाच्या जाचाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या

आई वडिलांचा अपमान सहन न झाल्याने घेतला गळफास

 पिंपळगाव राजा (प्रतिनिधी) : आई-वडिलांचा अपमान सहन न झाल्याने एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकाच्या जाचाला कंटाळून दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या करीत जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना १ जुलै रोजी नांदुरा तालुक्यातील वसाडी बु. येथे उघडकीस आली आहे. आत्महत्येनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई पिपंळगाव राजा पोलीस करीत आहे.

नांदुरा तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस हद्दीत असलेल्या वसाडी बु. येथील विनायक महादेव राऊत  वय १६  हा स्थानिक जय बजरंग विद्यालयात १० वीमध्ये शिक्षण घेत होता. दरम्यान  काल, १ जुलै रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास  विनायकने त्यांच्या पांढरीच्या शेतातील नव्याने बांधलेल्या घरात एंगलला दोरीच्या साह्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.  आत्महत्येनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पि.राजा पोलीसांनी मृतदेहाची तपासणी करताना विनायकच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत त्याने वर्गशिक्षक गोपाळ मारुती सूर्यवंशी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चिठ्ठीत, “आईवडीलांबद्दल अपशब्द वापरून वारंवार अपमान केल्याने मी आत्महत्या करीत आहे,” असे नमूद करण्यात आले आहे. या शिक्षकाविरोधात यापूर्वीही वर्तनाबाबत तक्रारी होत्या. गावकऱ्यांनी शिक्षण संस्थेकडे लेखी तक्रार करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. सुरुवातीला त्यांची बदली करण्यात आली, मात्र काही दिवसांतच त्यांना पुन्हा त्याच शाळेत सुर्यवंशी यांना नियुक्त करण्यात आले. जर सुर्यवंशी यांच्यावर वेळीच योग्य कारवाई झाली असती, तर आज एक चांगला, हुशार विद्यार्थी विनायक वाचला असता, अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत शिक्षक सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले आहे. तर मृतक विनायकचे काका केशव विष्णू राऊत वय ३९ रा. वसाडी बु. यांच्या तक्रारीवरुन  पिं. राजा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गोपाळ मारुती सूर्यवंशी यांच्या विरुध्द कलम १०७ बीएनएस नुसार गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास पोलिस निरीक्षक मुकेश गुजर करीत आहे.

Maharashtraniti
Author: Maharashtraniti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts