नांदुरा (राहुल चोपडे) बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा व अप्पर पोलीस अधीक्षक पथकास मिळालेल्या गुप्त माहितीवरुन एलसीबीने धडक कारवाई करत नांदुरा येथून अवैधरित्या तलवारी विक्रीस घेवून जाणाऱ्यास ताब्यात घेवून त्याच्याजवळून ४१ तलवारी, मोबाईलसह दुचाकी असा एकून १ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक केली आहे. सदर कारवाई २० ऑगस्ट रोजी करण्यात आली. या कारवाईमुळे अवैधधंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

नांदुरा येथे दुचाकीवरून अवैधरित्या तलवारी विक्रीस नेत असल्याची गुप्त माहिती बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा व अप्पर पोलीस अधीक्षक पथकास मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा व एलसीबी प्रमुख पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी २० ऑगस्ट रोजी नांदुरा येथे शाहीण कॉलनी भागात सापळा रचला असता शेख वसीम शेख सलीम वय ३३ हा त्याच्या राहत्या घरासमोर दुचाकी क्रमांक एम.एच -२८ – बी.एन वरुन पांढ-या पोतडीत तलवारी घेवून जात होता. दरम्यान पोलीसांनी त्यास ताब्यात घेवून पोतडीची पाहणी केली असता त्यामध्ये लाल म्यान असलेल्या ४१ तलवारी आढळून आल्या. यावेळी पोलीसांनी शेख वसीम यास ताब्यात घेवून त्याच्याजवळून ४१ तलवारी कींमती ८२ हजार, मोबाईल किंमती २० हजार व पल्सर कंपनीची दुचाकी किंमती ८० हजार असा एकून १ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नांदुरा पोलीस स्टेशनला आर्म ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदशनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांच्यासह एलसीबी प्रमुख सुनिल अंबूलकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पाहेकॉ चाँद शेख, पोकॉ शिवशंकर वायाळ, पोकॉ गणेश पाटील यांनी केली.








