खामगाव (प्रतिनिधी ):- रुग्णांना आरोग्य सेवेसह सर्व सोयी सुविधा वेळेवर मिळाव्यात, तसेच योग्य वेळी उपचार मिळावे. तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांना रक्त व त्यातील घटक करिता ब्लड कंम्पोनेंट्स मशीन उपलब्ध करून द्यावी यासह विविध मागण्यासाठी गाझी फाउंडेशन खामगावच्या वतीने खामगाव सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. निलेश टापरे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात रुग्णांना आरोग्य सेवेसह सर्व सोयी सुविधा वेळेवर मिळाव्यात, तसेच योग्य वेळी उपचार मिळावे. तसेच थॅलेसेमियाग्रस्त मुलांना आणि इतर गरजूंना खामगाव सामान्य रुग्णालयातच रक्त आणि त्यातील घटकांची (Blood Components) सुविधा मिळावी. यासाठी रुग्णालयात एक घटक मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सामान्य रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसल्याने, रक्त घटक खाजगी रक्तपेढ्यांमधून किंवा अकोला येथून रक्त आणावे लागते. त्या करिता रुग्णाच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे सामान्य रुग्णालयांमध्ये गरिबांसाठी रक्ताची सुविधा मोफत आहे तशीच ही सुविधा देखील उपलब्ध असावी जेणेकरून गरीब आणि गरजूंना त्याचा फायदा घेता येईल.
विशेषतः थॅलेसेमियाग्रस्त मुलांना उपचारासाठी अकोला किंवा इतर दुर्गम शहरांमध्ये जावे लागते, ज्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे सर्व सुविधा मिळावी अशी मागणी गाझी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली. यावेळी गाझी फाउंडेशनने रुग्णालय प्रशासनाला विनंती केली आहे की ही मशीन लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून मुलांचे जीव वाचू शकतील आणि कुटुंबियांना मोठा दिलासा मिळू शकेल असे निवेदनात नमूद आहे.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष जव्वाद अफझल खान, सचिव सुफियान बेग, कोषाध्यक्ष इम्रान खान, जफर खान, मोहम्मद रझा, सज्जाद फैसल आणि इतर अनेक सदस्य उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना, गाझी फाउंडेशनचे अध्यक्ष जव्वाद अफझल खान यांनी हा जनहिताचा मुद्दा असल्याचे म्हटले आणि सांगितले की आम्ही या विषयावर स्थानिक आमदार आणि कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांनाही निवेदन देऊ. आम्हाला आशा आहे की प्रशासन लवकरच या दिशेने ठोस पावले उचलेल.








