खामगाव/बुलढाणा ( प्रतिनिधी) : शासनाने ज्वारी खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदी करायला फार कमी वेळ देऊन शेतकऱ्यांची पळा पळ केली. पिकपेरा नोंदणीचे ऍप बंद पाडून अनेकांना तर पिकपेरा नोंद करताच आली नाही. ज्वारी विक्रीसाठी नोंदणी करायला दोन महिने उलटून गेले तरी शासन खरेदी सुरू करायला तयारच नाही. अनेक शेतकऱ्यांना साठवण करायला जागा नाही, जास्त दिवस झाले तर किड लागण्याची भिती असते अश्या अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर आहेत. अनेक शेतकऱ्यांना बाजारात बेभाव ज्वारी विक्री करावी लागली.एकीकडे मतांसाठी “माझी लाडकी बहीण” सारख्या देखण्या योजना जाहीर करून महिलांसोबत पुरुषांना कामाला लावले. सोशल मिडियावर सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या फसव्या बातम्या पसरवण्याचे काम जोरात सुरू आहे. पण लाभ मिळायला पत्ताच नाही असे सत्याग्रह शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय संयोजक कैलास फाटे यांनी म्हटले. ज्वारी खरेदी मध्ये शासनाची वा प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. ज्वारी खरेदी ही फसवी असेल तर लवकरच सत्याग्रह शेतकरी संघटना तीव्र आंदोलन सुरू करेल असा इशारा कैलास फाटे यांनी शासन व प्रशासनाला दिल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.








