खामगाव (प्रतिनिधी): निराधार स्त्रिया, अपंग बांधव व वयोवृद्धांना मिळणारे संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे थकित अनुदान दिवाळीपूर्वी मिळावे या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले आहे.

सदर निवेदनात नमूद केले आहे की, राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत व श्रावण बाळ योजना अंतर्गत लाभार्थ्यांना २०२५ पासून डीबीटी मार्फत लाभ हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. परंतु अनेक लाभार्थ्यांची अकाउंट डीबीटीला लिंक नसल्यामुळे त्यांचे सुमारे ६ महिन्याचे अनुदान थकले आहे. काही लाभार्थ्यांना अकाउंटला डीबीटी लिंक केल्यानंतर फक्त चालू महिन्याचे १५०० रुपयांचे अनुदान मिळाले आहे. थकित अनुदान मिळण्यासाठी संबंधित बँक व संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात लाभार्थ्यांनी चकरा मारल्या असता कोणत्याही समाधानकारक उत्तरे मिळत नाही. तरी या योजनांचा पैसा गेला कोठे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एकीकडे शासन कोट्यवधी रुपये जाहिरातीवर उधळत असताना प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मात्र १५०० रुपयासाठी अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या सणासुदीचे दिवस असून येत्या काही दिवसात नवरात्र त्यानंतर दसरा व दिवाळी सण आहेत. लाभार्थ्यांना थकीत अनुदान न मिळाल्यास त्यांची दिवाळी अंधारात जाऊ शकते. तरी वरील दोन्ही योजनेचे थकीत अनुदान दिवाळीपूर्वी मिळण्याचे दृष्टीने आपले स्तरावरून संबंधितास योग्य ते आदेश द्यावेत अन्यथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल व त्यापासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील असेही जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी निवेदनात नमूद केले आहे. सदर निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री मकरंद जाधव, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, शहर पोलीस स्टेशन ठाणेदार,शिवाजीनगर पोलीस स्टेशन ठाणेदार, राष्ट्रीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांनाही पाठविण्यात आलेले आहेत.








