बुलडाणा(प्रतिनिधी) : येत्या खरीप हंगामासाठी पीक कर्जाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यातून मुबलक प्रमाणात कर्ज पुरवठा होणार आहे. बियाणे, रासायनिक खते यासाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पुढे येऊन पीक कर्ज घ्यावे, तसेच शून्य टक्के व्याज दराचा लाभ घेण्यासाठी जुन्या पीक कर्जाचे 30 जून पूर्वी पुनर्गठन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
बुलढाणा जिल्ह्याला १५०० कोटी रुपयाचा पीक कर्ज आराखडा मंजूर झाला आहे. यात आतापर्यंत 30 टक्के म्हणजेच सुमारे ४५० कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना विनासायास कर्जपुरवठा व्हावा, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी बँकेमध्ये अर्ज करावा. कर्ज मिळण्यास अडचण आल्यास जिल्हा अग्रणी बँकेतर्फे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी 7507766004 या क्रमांकावर संपर्क करावा.
शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेतलेले असल्यास सदर पीक कर्जाची परतफेड 30 जून पूर्वी करणे आवश्यक आहे. 30 जून पूर्वी कर्जाची परतफेड झाल्यास शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ होणार असून शून्य टक्के व्याजदर लागणार आहे. तसेच कर्जाचे पुनर्गठन केल्यासही शून्य टक्के व्याजाने आकारणी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतेही व्याज भरावे लागणार नाही. पीक कर्ज घेतल्याने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदर, सिबिल स्कोर आदी फायदे होणार आहेत
शेतकऱ्यांना सुलभरीत्या कर्ज पुरवठा होण्यासाठी प्रत्येक बँकेत विशेष खिडकी निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी केवळ शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे अर्ज निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना कोणताही त्रास होणार नाही. शेतकऱ्यांचे पीक कर्जाची प्रकरणे जलद गतीने मंजूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिले आहे.








