बुलडाणा(प्रतिनिधी) : येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषि विभागातर्फे जिल्हा कृषी अधिक्षक ढगे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदीस प्राधान्य द्यावे. बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून देयकासह खरेदी करावे. बिलावर बियाण्याचा संपूर्ण तपशील यात पीक, वाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत व आपण स्वत: बिलावर सही, अंगठा देवून विक्रेत्याची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी. खरेदी केलेल्या बियाणांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची बिले व त्यातील थोडे ओंजळभर बियाणे पिकाची कापणी होईपर्यत जपून ठेवावे. खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची पाकीटे, बॅग सिलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरची बॅगवरील अंतिम मुदत पाहून घ्यावी.
कमी वजनाच्या निविष्ठा, तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कृषि अधिकारी पंचायत समिती, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक, मोहीम अधिकारी जिल्हा परिषद, कृषि विकास अधिकारी बुलडाणा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बुलडाणा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे
.








