बुलढाणा(प्रतिनिधी) : जागतिक वन दिनानिमित्त बुलढाणा प्रादेशिक वनविभागाच्या वतीने “रन फॉर फॉरेस्ट 1.0” या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत झाडे लावण्याची आणि त्यांचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित केली.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “एक दिवस धावून पर्यावरण संवर्धन करता येणार नाही, तर हे दैनंदिन सवयीत आणले पाहिजे. झाडे लावून त्यांचे संगोपन करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाने यात सहभागी व्हायला हवे.” त्यांनी विद्यार्थ्यांना आणि युवकांना वृक्षारोपण आणि संवर्धनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
1000 आंब्याची झाडे वाटप
कार्यक्रमाच्या वेळी वनविभागाच्या वतीने 1000 आंब्याची झाडे वितरित करण्यात आली. उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी “फॉरेस्ट आणि फूड” या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले. जंगल टिकवण्यासाठी नागरिकांनी वन विभागासोबत हात मिळवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या मॅरेथॉनमध्ये 600 हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या धावपटूंना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
विजेते स्पर्धक
१० किमी मॅरेथॉन – प्रथम: जयेश विलास पाटील, व्दितीय: वैभव पुरुषोत्तम बरडे, तृतीय: जाहीन मदे खा पठाण. प्रोत्साहनपर पारितोषिक प्रणाली शेगोकर यांनी पटकावले.
५ किमी मॅरेथॉन – प्रथम: गौरी वसंत राठोड, व्दितीय: लक्ष्मी महेश शेळके, तृतीय: दिव्या मोहनलाल जाधव.
३ किमी मॅरेथॉन – प्रथम: नेहा सुखदेव जाधव, व्दितीय: प्रगती प्रमोद राऊत, तृतीय: मृणाल संजय पडोळसे.
अनेक मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला विभागीय वन अधिकारी विपुल राठोड, जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी डॉ.पराग नवलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले, सहायक वनसंरक्षक अश्विनी आपेट, तसेच जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या मॅरेथॉनमध्ये बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रण व्यवस्था ठेवली होती. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन राऊत यांनी मानले.








