MAHARASHTRANITI/महाराष्ट्रनिती

मराठा, बहुजन युवकांनी उद्योगशिलतेकडे वळणे नितांत गरजेचे- सौरभ खेडेकर

मराठा सेवा संघ संचलित माँ जिजाऊ रथयात्रेचे खामगावात जंगी स्वागत

खामगाव(प्रतिनिधी )-: आरक्षणाचा प्रश्न आज एवढा जटील झाला आहे की तो केव्हा सुटेल हे कुणीही सांगू शकत नाही, आणि राज्यकर्त्यांना हा प्रश्न कुठल्याही अंगाने सोडवायचा नाही, उलट तो कसा पेटत राहील आणि जातीय संघर्ष कसा होत राहील, यासाठीच येथील व्यवस्था काम करीत आहे. आरक्षणाचे अस्तित्व आज धोक्यात आले असून राज्य व केंद्र सरकारमार्फत खाजगीकरण झपाट्याने होत आहे. सरकारी नोकऱ्या ह्या येणाऱ्या काही वर्षात जवळपास शुन्य टक्क्यांवर येणार आहेत. त्यामुळे आरक्षणाचा फायदा हा नोकरीसाठी जवळपास शुन्य झाला असून जो काही असेल तो केवळ राजकारणापुरता असणार आहे. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावरून एकमेकांमध्ये तणाव निर्माण करण्यापेक्षा आपण जोपर्यंत उद्योगशितेकडे वळत नाही तोपर्यंत आपला विकास होवू शकत नाही. त्यामुळे मराठा, बहुजन युवकांनी आता उद्योगशिलतेकडे वळणे हे नितांत गरजेचे आहे, असे मत संभाजी ब्रिगेडचे महासचिव तथा जिजाऊ रथयात्रेचे प्रमुख सौरभ खेडेकर यांनी व्यक्त केले.


मराठा सेवा संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जिजाऊ रथयात्रा काढण्यात आली असून २० एप्रिल रोजी जिजाऊ रथयात्रेचे खामगाव शहरात आगमन झाले. दरम्यान येथील तुळजाई हॉटेल मधील हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर मराठा सेवा संघाचे पदाधिकारी अरविंद गावंडे प्रदेश उपाध्यक्ष, अशोक पटोकार, प्रेमकुमार बोके, उमाकांत उफाडे, डॉ गजानन पारधी, डॉ गौरव टिकार, वारकरी परिषदेच्या ज्योतीताई,राजे जाधव माँ जिजाऊ ब्रिगेडच्या वनिताताई अरबट, सिमाताई ठाकरे, उर्मिला हांडे, दिलीप चौधरी, ॲड प्रदिप पाटिल क्षिरसागर हाईकोर्ट नागपुर व रविकांत काऴवाघे, डॉ मनोहर तुपकर, किशोरआप्पा भोसले यांच्यासह समन्वयकांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना सौरभ खेडेकर म्हणाले की, आज जातीयवाद, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, धार्मिक आणि राजकीय उन्माद यांसारख्या अनेक कारणांनी सामाजिक एकता घोक्यात आली आहे. धार्मिक सलोखा दुभंगला आहे आणि समाजाची मजबूत विण विस्कटत चालली आहे. समाजामध्ये संशयाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे समाजमन अस्वस्थ, संशयग्रस्त आणि असुरक्षित वाटत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी युवक-युवती, विद्यार्थी, शेतकरी, महिला-पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी, समाजाला एकसंघ करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत आपल्या ऐक्याचा जागर घालण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा अंतर्गत बहुजन मराठा जोडो अभियान आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले व विविध मुद्यांवर त्यांनी संवाद साधला.
तत्पूर्वी, मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रेचे 20 एप्रिल रविवारी दुपारी १.३० वाजता खामगाव – शेगाव रोडवरील उड्डाणपुलाजवळ आगमण झाले. याठिकाणी रथयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर सामान्य रूग्णालयातील महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रथयात्रा बारादरी, अर्जुन जल मंदिर, सरकी लाईन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे पोहचली. याठिकाणी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर परत अर्जुन जल मंदिर, महाविर चौक, फरशी, भगतसिंग चौक, एकबोटे चौक, टॉवर चौक, जलंब नाका, नांदुरा रोड मार्गे नांदुरा कडे मार्गस्थ झाली. दरम्यान रथयात्रेचे शहरातील प्रत्येक चौकात विविध सामाजिक संघटना, विविध पक्ष, समाज बांधव व नागरिकांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत स्वागत करून रथयात्रेतील राजमाता राष्ट्रमाता मॉ साहेब जिजाऊ यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. दरम्यान शहरातील रस्त्यांवर लावलेले स्वागताचे बॅनर, भगवे झेंडे, शहरातून निघालेली भव्य जय शिवरायचा जयघोष पहायला मिळाला. सभेचे प्रास्ताविक सुभाष राव कोल्हे यानी सुत्र संचालन सुनील खैरात तर आभार प्रदर्शन रविन्द्र चेके यानी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिजाऊ रथयात्रा समन्वय समितिने अथक परिश्रम घेतले.

Maharashtraniti
Author: Maharashtraniti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts