खामगाव(प्रतिनिधी):- नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी खामगावात भेदभावपूर्ण व हिटलरशाही पध्दतीने अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबवितांना अनेक गोरगरीब अतिक्रमण धारकांना नोटीस न देता त्यांचे अतिक्रमण जेसीबीद्वारे चकनाचूर करुन शहरातील जनतेचे कोटयवधी रुपयांचे नुकसान केले आहे. एकीकडे गरीब लोकांच्या दुकानावर बुलडोजर चालवायचा दुसरीकडे धनाड्य लोकांना अभय देणाऱ्या भ्रष्ट मुख्याधिकाऱ्यांच्या या अमानवीय कृतीमुळे तळहातावर पोट भरणाऱ्या हजारो अतिक्रमण धारकांसमोर रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे मुख्याधिकारी हे लोकांना कायद्याचे ज्ञान देतात तर दुसरीकडे स्वतः कायद्याचे उल्लंघन करुन रुग्णालयासाठी राखीव असलेल्या जागेमध्ये बेकायदेशीररित्या स्वतःकरीता कोटयवधी रुपयांचे निवासस्थान बांधून कायदा पायदळी तुडवीत आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या या मनमानी आणि हिटलरशाही विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व संबंधीतांना तक्रार केली आहे. 1 जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेवून अमानवीय पध्दतीने अतीक्रमण काढून महायुती सरकारची बदनामी करणारे व “गरिबावर काया अन् श्रीमंतावर माया” करणाऱ्या भ्रष्ट मुख्याधिकारी व त्यांच्या आकाचा पर्दाफाश करुन अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून देवू, अशी ग्वाही माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिली.

खामगाव नगर पालीकेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पालीकेच्या वतीने 27 व 28 जुन 2025 रोजी खामगाव शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी 28 जून रोजी पत्रकार बांधवांना सोबत घेवुन श्री चंदनशेष चौक मधील अतिक्रमण धारक व नेहरु कॉम्प्लेक्समधील व्यावसायीकांची भेट घेतली व अतिक्रमण निर्मुलन मोहिमे दरम्यान झालेल्या नुकसानीबाबत व्यावसायीकांची आस्थेने विचारपुस करुन माहिती जाणून घेत तुम्हाला निश्चीतपणे न्याय मिळवुन देईल असा धीर दिला. यावेळी माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, मनोज वानखडे, पोशाख ड्रेसेसचे संचालक संजुभाऊ शर्मा, माजी नगरसेवक ओमभाऊ शर्मा, सुनिलसिंह ठाकुर, बाजार समितीचे संचालक मंगेश इंगळे, प्रताप कदम, वैभव वानखडे, अतुल संत, तुषार चंदेल, केशव कापले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

अतिक्रमण मोहिम राबवितांना भेदभावपूर्ण कारवाई करण्यात आली. काहींना अल्पावधीचीही संधी न देता जेसीबीने त्यांची दुकाने तोडण्यात आली. यामुळे त्यांच्या लाखो रुपये किंमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून आपल्यावर उपासमारीची वेळ आली आहे असा टाहो अनेक जणांनी फोडला.नेहरु कॉम्प्लेक्समध्ये रहदारीला अडथळा नसतांना व अतिक्रमणाच्या व्याख्येत न बसणारे टिनशेड व हजारो रुपये किंमतीच्या दुकानाचे आकर्षक फलक सुध्दा मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी मनमानी पध्दतीने काढुन टाकले तर काही दुकानाच्या पायऱ्या सुध्दा तोडुन टाकल्या. मोहिमे दरम्यान या कॉम्प्लेक्समधील काही दुकानांचे बांधकाम सुध्दा पाडले गेले असल्याची तक्रार व्यावसायीकांनी केली. या कार्यवाही दरम्यान काहींना अभय देण्यात आले. त्यांना अतिक्रमण हटविण्याची संधी सुध्दा देण्यात आली असल्याची तक्रार नागरीकांनी सानंदांकडे केली.यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी अतिक्रमणधारक व्यावसायीक व दुकानदारांसोबत चर्चा करुन झालेल्या नुकसानीची माहिती जाणुन घेतली. या अतिक्रमण निर्मुलन मोहिमे दरम्यान ज्या-ज्या नागरीकांचे अतिक्रमण नाहीत परंतू कारवाई दरम्यान त्यांच्या मालमत्तेचे व दुकानांचे सुध्दा नुकसान झाले आहे अश्या नागरीकांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी सर्व माहितीसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन द्यावे, असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी अतिक्रमण धारक नागरीकांना सोबत घेवुन उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांची भेट घेतली व अतिक्रमण धारकांवर झालेल्या अन्यायाबाबत सविस्तर माहिती दिली. अतिक्रमण नसतांना सुध्दा काही जणांचे दुकाने तोडण्यात आले. मुख्याधिकारी यांनी केलेली अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई ही जुल्मी व अमानवीय आहे, म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणी संदर्भात माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांना निवेदन सुध्दा दिले. भेटी दरम्यान खामगाव नगर परिषदेमध्ये खुल्याआमपणे होत असलेल्या भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराची माहिती सुध्दा सानंदा यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिली. मुख्याधिकाऱ्यांच्या या कृत्यामुळे महायुती सरकारची बदनामी होत आहे. म्हणून भ्रष्ट प्रवृत्तीचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कारवाई न झाल्यास जनहितार्थ जनआंदोलन करण्यात येईल. असा इशारा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. अतिक्रमण मोहिम राबवितांना कारवाई दरम्यान नगर परिषद प्रशासनाने रोडलगत असलेले शहरातील तीन झुणका भाकर केंद्र जेसीबीच्या साहयाने तोडले आहे. यामध्ये बसस्थानक समोरील झुणका भाकर केंद्र, रेल्वे स्टेशन मालधक्का जवळील मराठा चहा लगतचे व टॉवर चौकातील झुणका भाकर केंद्र तोडण्यात आले आहे. परंतू रेल्वे गेट जवळील राजकीय आश्रय असलेल्या एका इसमाचे झुणका भाकर केंद्र तोडण्यात आले नाही, त्याचप्रमाणे मस्तान चौक भागात सुध्दा अतीक्रमण मोहिम राबवितवांना नगरसेविका पतीने नालीवर पक्क्या स्वरुपाचे बांधकाम करुन टिनशेड टाकुन केलेले अतीक्रमण सुध्दा काढण्यात आले नाही. हाच प्रकार टिळक मैदान परिसरात सुध्दा केला गेला आहे.एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याने जर ही अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई केली असती तर सर्वांना त्याचा अभिमान वाटला असता. मात्र भ्रष्टाचाराने अनेक आरोप असलेले वादग्रस्त मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांच्या सारख्या अधिकाऱ्याने अतिक्रमण काढण्यासाठी मोहिम राबविली याबदद्ल नागरीकांच्या मनात शंका-कुशंका येत आहे. मुख्याधिकारी यांना आकाचा फोन आल्यानंतर त्यांनी अतीक्रमणाची कारवाई केली आणि आकाच्या फोन आल्यानंतरच कारवाई थांबवली. मुख्याधिऱ्यांचा खरा आका कोण आहे ? हे खामगावकर जनतेला सर्वश्रृत आहे.
गोरगरीब अतिक्रमण धारकांकडून मुख्यधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधीचा जाहीर निषेध
खामगाव – नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत गोरगरीब नागरिकांच्या पोटावर लाथ अतिक्रमण काढतांना जेसीबीद्वारे अनेक दुकाने काढतांना साहित्याची तोडफोड झाल्याने लाखोंचे नुकसान तर नगर परिषदने उदरनिर्वाहाचे पर्यायी सुविधा उपलब्ध करून न दिल्याने कुटुंबावर उपास मारीची वेळ आली आहे. लोकप्रतिनिधीचे जनतेच्या समम्याकडे दुर्लक्ष तर अतिक्रमण काढण्यापूर्वी गोरगरीब जनतेला नोटीस दिल्या मात्र खामगाव नगर परिषद व स्थानिक लोकप्रतिनिधी पर्यायी व्यवस्था करून देण्याची आवश्यकता होती असताना नगर परिषद व स्थानिक लोकप्रतिनिधीनी नागरिकांच्या समस्याकडे नजाराअंदाज केल्याची सामान्य नागरिकांची ओरड असून धनाड्य लोकांचे अतिक्रमण काढण्यास “आर्थिक दिरंगाई” करत आहे. त्यांचे अतिक्रमण कधी काढणार? असा गरीब जनतेचा प्रश्न आहे. तर गोरगरीब जनतेच्या पोटावर लाथ मारण्याऱ्या अतिक्रमण हटाव मोहीम, नगर परिषद व लोकप्रतिनिधिचा अतिक्रमणधारक गोरगरीब नागरिकांकडून जाहीर निषेध करण्यात आला.








