MAHARASHTRANITI/महाराष्ट्रनिती

खरीप हंगामात उत्पादकता वाढीवर लक्ष केंद्रीत करावे -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा( प्रतिनिधी) : जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस पिकांवर शेतकऱ्यांची अवलंबितता अधिक आहे. या शेतकऱ्यांवर अरिष्ट ओढविल्यास त्यांची परिस्थिती बिकट होते. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर आणि त्यांची उत्पादकता वाढणारी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले. 29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोज ढगे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. गेल्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल अधिक होता. यावर्षी शेतकऱ्यांना नफा मिळवून देणारी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. यासाठी त्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे, बियाणे खरेदीची पावती, पिशवी आदी सांभाळून ठेवण्याचे सांगावे. तसेच विक्रेत्यांची नावे आणि पत्ते जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावेत. कोणत्याही परिस्थितीत बोगस बियाणे विक्री होऊ नये, यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात यावी. यासोबतच रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात यावा.शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती देण्यात यावी. चांगले वाण आणि कमी पाण्यात चांगली उत्पादकता देणारी, तसेच शेतीमधील नवीन बाबींची माहिती देण्यात यावी. नवीन संशोधनाची माहिती देऊन शेतकऱ्यांना शेती संरक्षित करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना शेती सुकररित्या करण्यासाठी यांत्रिकीकरण आणि इतर योजनांचा लाभ देण्यात यावा. एकात्मिक पद्धतीने शेती करण्यासोबतच त्यांचा शेतकरी उत्पादक कंपनीशी समन्वय साधून देण्यात यावा.पिक विम्यामुळे शेतकऱ्यांना आपदग्रस्तवेळी मदत मिळण्यास मदत होते. यावर्षी 234 कोटी रूपयांचा विमा शेतकऱ्यांना मिळाला आहे. विम्याची रक्कम मिळण्यास ईकेवासी नसल्याने अडचणी येत असल्यामुळे ईकेवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना सांगण्यात यावे. यासोबतच अपघात विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रकरणे तातडीने निकाली काढावेत. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. यातून 332 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.शेतकऱ्यांना मदतीसाठी पिक कर्ज महत्वाचे आहे. यावर्षी सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत. बँकांनी कर्ज प्रक्रिया करण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करावी. शेतकऱ्यांना मदतीसाठी नवीन वाणांची पिके देण्यात यावी. हळद, ओवा सारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. तसेच फळ पिके, बांबू लागवड आणि वैरण विकासाची कामे करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना ज्या योजनांमधून लाभ मिळणार आहे, अशा योजनांमध्ये त्यांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.

Maharashtraniti
Author: Maharashtraniti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts